जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचना हरकतींवरचा निकाल उद्या प्रसिद्ध होणार

कोल्हापूर - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेच्या हरकतीवरचा निकाल आज सोमवार रोजी प्राप्त झाला आहे. या निकालाची अधिकृत घोषणा उद्या मंगळवारी करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व तहसीलदार कार्यालयांतील सूचना फलकांवर निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण 141 हरकतींवरचा निकाल आज सोमवारी प्राप्त झाला. उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या हरकतींवर पुणे विभागीय आयुक्तांनी 5 ऑगस्ट रोजी सुनावणी घेतली होती. महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांनी पुणे येथे या निकालाचा अहवाल स्वीकारला आहे. हा निकाल आता संबंधित कार्यालयांमध्ये सूचना फलकावर लावण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेसाठी 128 आणि पंचायत समितीसाठी 13 अशा एकूण 141 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक 70 हरकती हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघाच्या रचनेविषयी होत्या. तर करवीर तालुक्यातून 36 तक्रारी दाखल झाल्या होत्या. या हरकतींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मतदार संघाची अंतिम रचना 18 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.