श्री शाहू कुमार भवन, गारगोटी येथे रक्षाबंधन साजरा — सैनिक, वृध्द, पर्यावरण यांना राखी बांधून विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव दाखवली

<p>श्री शाहू कुमार भवन, गारगोटी येथे रक्षाबंधन साजरा — सैनिक, वृध्द, पर्यावरण यांना राखी बांधून विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव दाखवली</p>

गारगोटी : श्री शाहू कुमार भवन प्रशालेत रक्षाबंधन आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवत सणाचे खरे स्वरूप अधोरेखित केले.

9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने गारगोटी कचेरीवरील हल्ल्यात हुतात्मा झालेल्या क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी गार्ड ऑफ ऑनर देत त्यांचे स्मरण केले. रक्षाबंधन सणानिमित्त प्रशालेच्या विद्यार्थिनींनी तब्बल 5000 राख्या तयार केल्या. या राख्या देशभरातील सीमेवर सेवा देणाऱ्या भारतीय जवानांना पाठवण्यात आल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी देशभक्ती व कृतज्ञता व्यक्त केली.

त्याचप्रमाणे एनसीसी विभागाच्या वतीने स्थानिक वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांना राखी बांधण्यात आली व त्यांच्यासोबत वेळ घालवून आनंद साजरा करण्यात आला. पर्यावरणप्रेम व्यक्त करत झाडांनाही राखी बांधण्याचा उपक्रम विद्यार्थिनींनी राबवला. यामार्फत निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकमेकांना राखी बांधून बंधुत्व व ऐक्याचा सण आनंदात साजरा केला.

कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक एस. बी. शिंदे व पी. एम. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन एन. ए. जाधव यांनी, तर आभारप्रदर्शन आर. ए. पलंगे यांनी केले.