महादेवी हत्तीणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश...

<p>महादेवी हत्तीणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश...</p>

नवी दिल्ली - शिरोळ तालुक्यातील नांदणी मठात माधुरी अर्थात महादेवी हत्तीण गेल्या अनेक वर्षापासून होती. पेटा संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला गुजरातमधील वनतारामध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जुलैमध्ये जैन मठाच्या व्यवस्थापनाची या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. महादेवीला वनतारामध्ये नेल्यानंतर या निर्णया विरोधात मोठा जनक्षोभ उसळला. नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. नांदणी ते कोल्हापूर अशी मूक पदयात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते. आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून महादेवीला परत आणण्यासाठी देशव्यापी स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये दोन लाखांहून अधिक लोकांनी सहभागी होत राष्ट्रपतींना महादेवीला पुन्हा जैन मठात आणण्यासाठी विनंती करण्यात आली. या व्यापक जन आंदोलनांची वनतारा आणि राज्य सरकारला दखल घ्यावी लागली. मुख्यमंत्र्यांनी नांदणी मठाच्या महास्वामींसह जिल्ह्यातील आजी - माजी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावत महादेवीसाठी पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या न्यायालयीन लढाईसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयाने आज याचिका दाखल करुन घेतलीय. सरन्यायाधीश बी. आर. गवई, न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन आणि ए. एस. चांदूरकर यांच्या खंडपीठाने या याचिके वरील सुनावणीसाठी सहमती दर्शवलीय. गुरुवारी चौदा ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.