ट्रॅक्टरवर जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला कोल्हापुरातून विरोध
आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत फोडलं केंद्र सरकारचं बिंग

कोल्हापूर - ट्रॅक्टरवर जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला कोल्हापुरातून विरोध झालाय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेवून या विरोधात पोस्टाद्वारे किंवा ईमेल द्वारे हरकती नोंदवण्याचं सर्वांना आवाहन केलंय. वेळ पडल्यास आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय.
विमानासारखं ट्रॅक्टरवर सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यामुळे पंचवीस ते तीस हजाराचा ज्यादा बोजा ट्रॅक्टर मालकांवर पडणार आहे. ईडीआर आणि जीपीएस ट्रॅक्टरवर लावायची गरज नसताना केंद्र सरकारकडून अधिसूचना काढण्यात आली आहे. या निर्णयाला थेट विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार बैठक घेवून याबाबत माहिती दिली. दिल्लीत एसी कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे बनवणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत. आमचा शेतकरी महामार्गावर व्यावसायिक वाहतूक करत नाही. त्याच्या ट्रॅक्टरवर पंचवीस ते तीस हजार खर्चून अनावश्यक उपकरणे बसवण्याची सक्ती करणे म्हणजे शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा घालण्यासारखे आहे. आधीच महागाई आणि इतर कारणांनी खचलेल्या शेतकऱ्याला हा खर्च परवडणारा नाही. दिल्लीत बसून शेतकऱ्यांसाठी कायदे करणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा समजत नाहीत. सरकारने वास्तवाचे भान ठेवून ही जाचक अधिसूचना रद्द करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नवीन मसुदा अधिसूचनेमुळे (G.S.R. 485(E) ) शेतकऱ्यांच्या खिशावर मोठा अर्थिक भुर्दंड पडणार असून या नियमाने लाखो ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी दिलेला QR Code स्कॅन करा किंवा खालील लिंकवर क्लिक करून आपल्या हरकती नोंदवाव्यात..
https://sites.google.com/view/objectionagainstgsr485e/