रोबोटद्वारे मूत्रपिंड काढण्याची पहिलीच शस्त्रक्रिया अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये यशस्वी...
अॅस्टर आधारमध्ये रोबोटची कमाल

कोल्हापूर - अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये नुकतंच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते रोबोटिक सर्जरी विभागाचे उद्घाटन करण्यात आले. या विभागात एका ४५ वर्षीय रुग्णावर मूत्रपिंडाशी संबंधित रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आलीय. दोन वर्षांपूर्वी या रुग्णाच्या मूत्रपिंडाला ट्यूमर झाल्याचे निदान झाले होते. त्यावेळी त्या रुग्णाची गाठ दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आली. परंतु दोन वर्षानंतर पुन्हा वैद्यकीय चाचण्या केल्यावर त्या रुग्णाला भविष्यात होणारी कर्करोगाची शक्यता टाळण्यासाठी मूत्रपिंडाची आणखी एक शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांकडून निश्चित करण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी अॅस्टर आधार हॉस्पिटल व्यवस्थापनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा रोबोट वापरला.
डॉ. धनसागर वाकळे आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी या रुग्णाचे मूत्रपिंड रोबोटचा वापर करुन तीन ते चार तासांच्या शस्त्रक्रियेने काढले. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाचे अत्यंत कमी छेद घेण्यात आले. त्यामुळे शस्त्रक्रिया कमी वेदनादायी होण्यासह रुग्ण जलदगतीने बरा झाला. याच शस्त्रक्रियेदरम्यान पित्ताशयातील खड्यामुळे या रुग्णाची पित्ताशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रियादेखील करण्यात आली.
कमी छेद, कमी वेदना, संसर्गाचा कमीत कमी धोका आणि बरे होऊन लवकर दैनंदिन कामे करता येत असल्याने रोबोट शस्त्रक्रिया रुग्णांसाठी वरदान ठरतायत. या शस्त्रक्रियां मध्ये मानवी क्रियाशीलतेवरील मर्यादा दूर करण्यासह अचूकता वाढत असल्याने रोबोट शस्त्रक्रियांना भविष्यात प्राधान्य दिले जाऊ लागलंय. भविष्यात याच रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेची गरज भासली तर ती शस्त्रक्रिया सुध्दा करण्यासाठी अॅस्टर आधार हॉस्पिटल व्यवस्थापनाने तयारी ठेवली असल्याचे हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.