‘कोणत्याही मतदाराचे नाव नोटीस जारी केल्याशिवाय यादीतून वगळले जाणार नाही’ : निवडणूक आयोग

पटना – खा. राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या नावाच्या यादीबाबत होत असलेल्या कारभाराची पोलखोल केली होती. यावर निवडणूक आयोगाने “बिहार विशेष सखोल पुनरीक्षण दरम्यान कोणत्याही मतदाराचे नाव नोटीस जारी केल्याशिवाय यादीतून वगळले जाणार नाही” असे सुप्रीम कोर्टाला सांगितले आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले आहे की, ज्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांना आयोगाच्या लेखी आदेशाविरोधात दोन स्तरांवर अपील करण्याची सुविधा दिली जाईल. आयोगाच्या माहितीनुसार, 7 कोटी 89 लाख मतदारांपैकी 7 कोटी 24 लाख मतदारांचे फॉर्म प्राप्त झाले आहेत. त्यामुळे 65 लाख लोक ड्राफ्ट (मसुदा) यादीत समाविष्ट होऊ शकलेले नाहीत. या वगळलेल्या मतदारांविषयीची सविस्तर माहिती राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट्स (BLA) ना दिली गेली आहे. ड्राफ्ट यादीचे प्रकाशन 1 ऑगस्ट रोजी झाले, मात्र 20 जुलै रोजीच वगळलेल्या मतदारांची माहिती BLA ना देण्यात आली होती, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
बिहारमध्ये कोणताही पात्र मतदार यादीत नाव मिळवण्यापासून वंचित राहू नये. ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत, त्यांना राज्य सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून ती मिळवण्यासाठी मदत केली जात आहे, असेही आयोगाने सांगितले आहे.