निष्क्रिय पक्षांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई; महाराष्ट्रातील ९ पक्षांचा यादीत समावेश

कोल्हापूर - केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) देशभरातील 334 नोंदणीकृत, पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना (RUPPs - Registered Unrecognised Political Parties) निवडणूक यादीतून वगळले आहे. सलग सहा वर्षांपासून निवडणुकीत सहभागी न होणे, नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नसणे अथवा खोटा असणे, प्रमाणित माहिती न देणे अशा कारणावरून निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.
कायद्यानुसार कोणत्याही नोंदणीकृत पक्षानं पाच वर्षांच्या आत किमान एक निवडणूक लढवणं आवश्यक असतं. सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत भाग न घेतल्यास, आयोग त्या पक्षाला यादीतून वगळू शकतो. महाराष्ट्रातील 9 नोंदणीकृत पण निष्क्रिय पक्षांवर आयोगानं कारवाई केलीय. या सर्व पक्षांनी ना निवडणूक लढवली, ना आपला पत्ता अद्ययावत केला. या पक्षांना आता नाव, निवडणूक चिन्ह, अनुदान, करसवलती यांचा लाभ मिळणार नाही. जोपर्यंत पुन्हा नोंदणी केली जात नाही. तोपर्यंत ते पक्ष म्हणून कायदेशीर निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाहीत. देशात 2500 पेक्षा अधिक RUPPs आहेत. यातील अनेक पक्ष फक्त नावापुरते अस्तित्वात असून, ते राजकीय निधी किंवा करसवलतींचा गैरवापर करतात, असा आरोपही वारंवार झाला आहे.
या निर्णयाविरोधात कारवाईमधील कोणताही पक्ष 30 दिवसांच्या आत अपील करू शकतो. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सक्रिय राजकीय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
महाराष्ट्रातील ९ पक्षांचा यादीत समावेश -
1. अवामी विकास पार्टी
2. बहुजन रयत पार्टी
3. भारतीय संग्राम परिषद
4. इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया
5. नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी
6. नवबहुजन समाजपरिवर्तन पार्टी
7. पीपल्स गार्डियन
8. द लोक पार्टी ऑफ इंडिया
9. युवा शक्ती संघटना