गार्डन्स क्लब, कोल्हापूर तर्फे 'बीज राखी' प्रशिक्षण: पर्यावरण रक्षणाची बहिणींसोबत घेतली शपथ !

कोल्हापूर – पर्यावरण रक्षण आणि भावबंध यांचा संगम साधणाऱ्या ‘बीज राखी’ या उपक्रमात गार्डन्स क्लब कोल्हापूर तर्फे शहरातील सहा शाळांमध्ये 600 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या रक्षाबंधनाला प्रत्येक भावाच्या हातात राखी बांधली जाणार आहे, जी भविष्यात एक झाड बनेल. बहिणीबरोबरच पर्यावरणाचे रक्षण हा संदेश या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यात आला.
‘सेव अवर सीड्स’ या क्लबच्या विभागाने या अनोख्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले. पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळत असलेल्या पिढीला सेंद्रिय, नैसर्गिक व देशी पर्याय वापरण्याचे महत्व पटवून देण्यासाठी शालेय पातळीवर बीज राखी बनवण्याच्या कार्यशाळा घेतल्या. गार्डन्स क्लबने देशी वाणांची सीड बँक निर्माण केली असून शाळांमध्ये दृक्श्राव्य माध्यमातून बीजापासून झाडापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला. विद्यार्थ्यांना बीज प्रत्यक्ष पाहण्याची व हाताळण्याची संधी देण्यात आली.
उद्योगिनी संस्था, राधाबाई शिंदे शाळा, रोटाकिड्स, टेरियर शाळा, न्यू मॉडेल शाळा आणि शाहू विद्यालय अशा एकूण सहा संस्थांमध्ये बीज राखी कार्यशाळा राबवण्यात आली. या कार्यशाळांमध्ये सुमारे 600 शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. क्लबच्या पंधरा जणांच्या टीमने पूर्णपणे विघटनशील साहित्य, बेस पेपर, नैसर्गिक गोंद व लवकर उगवणाऱ्या बीया वापरून 600 किट्स तयार केल्या. या किट्स वापरून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या राख्या बनविल्या.
कार्यक्रमांचे संयोजन व मार्गदर्शन अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी केलं. सुप्रिया भस्मे, प्राजक्ता चरणे, वर्षा वायचळ, डॉ. रचना संपतकुमार, अभय कोटणीस, सुषमा शेवडे, चारुता शिंदे, अंजना पाटील, निशिगंधा कुलकर्णी, दीपा भिंगार्डे, मयूरा पाटील, रोहिणी पाटील, शैला निकम, चित्रा देशपांडे, रेणुका वाधवानी, रीना गरगटे या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी झाला. काही सदस्यांनी किट्स शाळांबाहेरही वाटून या उपक्रमाचा प्रचार व प्रसार केला.