महिला सक्षमीकरणासाठी “पिंक ई-रिक्षा” आणि “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना – १० हजार ई-रिक्षा वितरित होणार

कोल्हापूर - महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” आणि “पिंक ई-रिक्षा” या दोन महत्त्वाकांक्षी योजना महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत, असे मत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. राज्यात यावर्षी १० हजार ई-रिक्षा वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात पिंक ई-रिक्षा आणि रुपे कार्डचे वितरण आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबीटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री हसन मुश्रीफ होते.
कोल्हापूर शहरातील ७०० अर्जदार महिलांपैकी ४०० महिला पिंक ई-रिक्षासाठी पात्र ठरल्या असून, भविष्यात विमानतळ, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी या रिक्षांचा वापर वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तटकरे यांनी सांगितले. याशिवाय, कोल्हापुरी चप्पल उद्योग आणि महिलांसाठीच्या नाविन्यपूर्ण योजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ३ टक्के निधीतून तरतूद व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी महिलांना पारंपरिक व्यवसायांसह नाविन्यपूर्ण उद्योग उभारण्याचे आवाहन केलं. महिला सक्षमीकरणासाठी विभाग विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पिंक ई-रिक्षाच्या माध्यमातून महिलांनी आत्मनिर्भर होऊन आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन केले. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी महिलांनी एकत्र येऊन कार्य केल्यास सकारात्मक बदल घडू शकतो, असे नमूद केले. ई-रिक्षा ही प्रदूषणमुक्त असल्याने पर्यावरण संरक्षणास हातभार लागेल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात महिला आणि बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर पालकमंत्री आबीटकर आणि मंत्री तटकरे यांनी पिंक ई-रिक्षामधून फेरफटका मारत प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या वेळी माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इतर मान्यवर उपस्थित होते.