ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन; 18 ऑगस्टपासून पुण्यात मोठा लढा उभारण्याचा इशारा

<p>ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन; 18 ऑगस्टपासून पुण्यात मोठा लढा उभारण्याचा इशारा</p>

कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करत एल्गार पुकारलाय. राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्यास येत्या 18 ऑगस्ट रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी यावेळी दिलाय. या आंदोलनाला काँग्रेस पक्षानेही ठाम पाठिंबा दिला असून, विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठींबा दर्शविला. मंत्रालय पातळीवर संघटनेची बैठक लावण्यासाठी आपण आवश्यक तो पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करण्यात यावे, तसेच राज्य शासनाच्या निर्णयानुसार 3,410 रुपये राहणीमान भत्ता तातडीने लागू करून मागील फरकाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह इतर विविध प्रश्नांवर तोडगा काढावा, या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने आज जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

आज आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा दर्शवला. राज्यभरात सुरू असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही याबाबत कळवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामीण विकासाचा कणा असून त्यांचे पगार थकवणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने कर्मचाऱ्यांसाठी घेतलेले निर्णय तातडीने अंमलात आणावेत, तसेच मंत्रालय स्तरावर संघटनेची बैठक बोलावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष सम्राट मोरे यांनी केला. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनीही पाठिंबा जाहीर केला. भविष्यात संघर्ष उभारण्याची वेळ आली, तर आपण कर्मचाऱ्यांच्या सोबत रस्त्यावर उतरून ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासन देवणे यांनी यावेळी दिले.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड रघुनाथ कांबळे आदींनीही मनोगतं व्यक्त केली

आंदोलनात बबन पाटील, रवी कांबळे अशोक पाटील,परशराम जाधव, अशोक गेंगे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी होते.