‘एक खिडकी सुविधा केंद्र’ गणेशोत्सव मंडळांसाठी ठरतंय सोयीचं

कोल्हापूर - गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसावर येवून ठेपला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तयारीला वेग आला आहे. शहरातील मंडळांना एकाच छताखाली उत्सव काळात मिरवणूक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परवानगी मिळावी. यासाठी पोलीस दलाच्या वतीने शहर पोलीस उपविभागीय कार्यालयाजवळ एक खिडकी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या ठिकाणी शहरातील विविध पोलीस ठाण्याचे आणि महापालिकेचे मिळून पंधरा ते वीस कर्मचारी काम करत आहेत. आज सकाळ पासूनच शहराच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते परवाना घेण्यासाठी आले होते. आज दिवसभरात २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कागदपत्रे जमा करून परवानगी घेतली आहे. शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळानी लवकरात लवक कागदपत्राची पूर्तता करून परवाने घ्यावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.