गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस अधीक्षकांचा सक्त आदेश – समाजकंटकांना सवलत नाही

कोल्हापूर - जिल्ह्यातील पोलीस दलाची मासिक गुन्हे आढावा बैठक गुरुवारी पोलीस मुख्यालयात पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना गणेशोत्सव व गोकुळाष्टमी काळात शांतता-सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
महत्त्वाच्या सूचना अशा -
- समाजकंटकांवर तडीपार किंवा ‘मोका’ कायद्यांतर्गत तत्काळ प्रस्ताव दाखल करा.
- ध्वनीमर्यादा व लेझर लाईटचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा.
- विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टीम रात्री १२ वाजता बंद करणे सक्तीचे.
- महिला व युवतींच्या छेडछाडीवर करडी नजर ठेवण्यासाठी गोपनीय शाखांची यंत्रणा सक्रिय करा.
- गणेश मंडळांना सीसीटीव्ही लावण्यासाठी प्रवृत्त करा.
- अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी अधिकाऱ्यांनी थेट जबाबदारी घ्यावी.
यावेळी पोलीस अधीक्षकांनी काही अधिकाऱ्यांना फटकारले. काळ्या धंद्यांचे समर्थन करणाऱ्यांवरही ताशेरे ओढण्यात आले. जर विशेष पथकाद्वारेच कारवाई करावी लागत असेल, तर संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, उपअधीक्षक अजित टिके, प्रिया पाटील, सुजित क्षीरसागर, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, संजीव झाडे, संतोष डोके, श्रीराम कण्हेरकर, सुशांत चव्हाण, वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे आणि सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.