शिवनाकवाडीत पाण्यासाठी ठिय्या आंदोलन; सरपंच पुत्राच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न

इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शिवनाकवाडी ग्रामपंचायतीबाहेर पाण्यासाठी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी सरपंच पुत्र स्वागत खोत यांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण बनलं होतं .
हातकणंगले तालुक्यातील शिवनाकवाडी इथल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर दत्त कॉलनीतल्या नागरिकांनी पाण्यासाठी ठिय्या आंदोलन केलं . हा सर्व प्रकार उपसरपंच निवडीदरम्यान झाल्यानं ग्रामपंचायतीच्या आवारात मोठा गोंधळ उडाला. . बोअरवेलवरून सुरु झालेली वादावादी नंतर शिवीगाळीपर्यंत पोहोचली. या साऱ्या प्रकरणात विद्यमान सरपंच सरिता खोत यांना भोवळ आली . त्यानंतर काही काळ ग्रामपंचायत आवारात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दत्त कॉलनीत पाणी पुरवठ्याचा मुख्य आधार असलेली बोअरवेल पूर्वी माजी सरपंच श्रीकांत खोत यांच्या खाजगी जागेत ग्रामपंचायतीनं मारलेला होती . त्यातूनच नागरिकांना पाणी पुरवलं जात होतं . मात्र गेल्या काही महिन्यांपासून श्रीकांत खोत हे, ही खाजगी जागा असल्याचं सांगून वारंवार पाणी पुरवठा बंद करत असल्यानं नागरिकांत नाराजी होती. या निषेधार्थ महिलांनी आज घागर, कळशी घेऊन ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केलं . या आंदोलनादरम्यान सरपंच सरिता खोत यांचे पुत्र स्वागत खोत यांनी सदरचा बोअरवेल हा ग्रामपंचायतीचा असल्याचं पत्र श्रीकांत खोत यांनी दिल्याचं सांगितलं .मात्र पत्राचा मुद्दा काढताच श्रीकांत खोत आणि स्वागत खोत यांच्यात जोरदार वादविवाद झाला. दोघांमध्ये शिवीगाळही झाली. याच वेळी जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे पावणे सहा कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर असून ती रखडल्याचं नागरिकांनी निदर्शनास आणून दिलं . या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नागरिकांनी माजी सरपंचांवर आरोपांची सरबत्ती केली. तर उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया सुरू असताना या साऱ्या गोंधळाचा मुद्दाम वापर होत असल्याचा आरोप उमेदवार अश्विनी खोत यांचे पती अनिल खोत यांनी केला. त्यांनी संतप्त होऊन स्वागत खोत यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळं परिस्थिती आणखी चिघळली. दरम्यान याचवेळी सरपंच सरिता खोत यांना भोवळ आल्यानं उपस्थितांनी त्यांना स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं . या संपूर्ण प्रकारामुळं ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.