जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत गटसचिवांच्या कार्यशाळेचे आयोजन

<p>जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत गटसचिवांच्या कार्यशाळेचे आयोजन</p>

कोल्हापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात गटसचिवांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सहकार विभागातील विकास सेवा संस्थांचं संगणकीकरण आणि केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत गट सचिवांना संगणकीकरणाच्या टप्प्यांबाबत माहिती देण्यात आली. तसंच केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी यावर राज्याचे सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मार्गदर्शन केलं.

यावेळी बोलताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सहकारी संस्था टिकल्या तर शेतकऱ्यांना वेळेत निधी उपलब्ध होतो. त्यामुळं सहकार संस्था सक्षम राहणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनानं सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.

कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी ,सेवा सोसायट्यांना अधिक सक्षम करण्यासाठी संगणकीकरण आणि केंद्रीय योजनांची माहिती या कार्यशाळेतून दिली जाणार असल्याचं सांगितलं.

यानंतर जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी,सादरीकरणाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आकडेवारी, उपक्रम आणि यशकथा सादर केल्या. जिल्ह्यातील कर्जपुरवठ्यात सहकारी संस्थांचा वाटा ६५ टक्के असून तो राज्यात सर्वाधिक आहे. पुढील १५ दिवसांत जिल्ह्यातील सर्व सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण करण्यात येईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केला.

यावेळी उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर उर्मिला राजमाने, प्रेम राठोड, सुजय येजरे, नितीन माने, उदय उलपे, महेश शेलार यांच्यासह सर्व तालुक्यातील सहायक निबंधक, संस्थांचे गटविकास अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.