आरटीई मधील 1200 विद्यार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या शाळांची चौकशी करा- आप ची शिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठकीत मागणी

कोल्हापूर - जिल्हापरिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीची आर. टी. ई. कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात बैठक पार पडली. यामध्ये 328 आरटीई नोंदणीकृत शाळांमध्ये 100% आरटीई कोटा भरला नसल्याचे निदर्शनास आले.
साधारण 3400 पात्र विद्यार्थ्यांपैकी फक्त 2150 इतक्यात विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यामधील जवळपास 1200 विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेकडे प्रवेशाची विचारणा केली नाही असे उत्तर शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.
आरटीई अंतर्गत प्रवेश मोफत असताना देखील काही बड्या खाजगी शाळांनी पालकांची दिशाभूल करून, त्यांच्याकडून फी ची मागणी करत असलेल्या काही तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे आलेल्या होत्या. तुम्हाला फी भरावी लागेल असे सांगून या 1200 विद्यार्थ्यांना नॉट अप्रोचड संवर्गाखाली टाकून त्यांचा प्रवेशच उडवला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने बैठकीत केला.
या संदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. तसेच लवकरच खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत बैठक घेण्याचे ठरले. आर टी ई 25% अंतर्गत प्रवेश मिळालेल्या पालकांच्याकडून शाळेने फी ची मागणी केली असल्यास अशा पालकांनी आम आदमी पार्टी, उद्यम नगर कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आप ने केले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, किरण साळोखे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समिर लतीफ, विजय हेगडे, उमेश वडर, ऋषी वीर, आदित्य पोवार, रमेश कोळी, दिलीप पाटील, विशाल सुतार आदी उपस्थित होते.