माधुरीच्या देखभालीबाबत वनताराकडून अधिकृत पत्रक जारी...

कोल्हापूर – माधुरी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनताराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर वनताराने अधिकृतरित्या माधुरीच्या देखभाल आणि शुश्रुषेबाबत निवेदन जारी केले आहे.
निवेदनात वनताराने म्हटले आहे कि, नांदणी मठास हवे असलेले सर्व सहाय्य करण्याची वनताराची इच्छा आणि तयारी आहे. आमचा सहभाग केवळ न्यायालयीन निर्देशानुसार असला तरी, जैन समुदायाला किंवा कोल्हापूरच्या लोकांना त्यामुळे काही त्रास होत असेल तर आम्ही मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. अजाणतेपणे आमचे विचार, शब्द किंवा कृतीने तुम्हाला दुखावले असेल, तर त्यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो. आपण सर्वजण माधुरीवरील प्रेमापोटी एकदिलाने काम करू, असे म्हटले आहे.
नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि कोल्हापूरच्या लोकांमध्ये माधुरीचे आत्यंतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे याची पूर्ण जाणीव वनतारास आहे. गेल्या अनेक दशकांपासून, ती आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा भाग राहिली आहे. माधुरी कोल्हापुरातच रहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि कदर आम्ही करतो.
यातील वनताराचा सहभाग सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या बंधनकारक निर्देशांनुसार काटेकोर काम करण्यापुरता मर्यादित आहे. माधुरीला हलविण्याचा निर्णय न्यायालयाने त्याच्या अधिकारात घेतला होता. स्वतंत्रपणे चालवलेले एक बचाव आणि पुनर्वसन केंद्र म्हणून त्यात वनताराची भूमिका केवळ माधुरीची देखभाल करणे, तिला पशुवैद्यकीय सहाय्य पुरविणे आणि तिच्या निवासाची व्यवस्था करणे अशी होती. वनताराने कोणत्याही टप्प्यावर माधुरीचे स्थलांतर करण्याची शिफारस केली नाही किंवा तिचे स्थलांतर सुरू केले नाही. धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नव्हता.
कायदेशीर वर्तन, प्राण्यांची जबाबदारीने काळजी घेणे आणि सामुदायिक सहकार्य यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यानुसार माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठींबा देईल. न्यायालयाच्या मान्यतेनुसार वनतारा तिच्या सुरक्षित आणि सन्मान्य परतीसाठी संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्य प्रदान करेल, असेही निवेदनात म्हटले आहे.