साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना 'भारतरत्न' देऊन सन्मानित करावं- साठे कुटुंबीयांची मागणी

कोल्हापूर - साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारनं 'भारतरत्न' देऊन सन्मानित करावं, अशी मागणी साठे कुटुंबीयांनी केलीय . ते एका कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठात आले होते. यावेळी त्यांनी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर 'एस न्यूज'शी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. या निमित्तानं शिवाजी विद्यापीठातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीनं परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादाला अण्णाभाऊ साठे यांचे कुटुंबीयांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर त्यांनी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासनची निर्मिती करून विद्यापीठानं खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराचा जागर केला असल्याच्या भावना व्यक्त करत त्यांनी आभार मानले . यानंतर एस न्यूजशी बोलताना अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारनं सन्मानित करावं, अशी मागणी केली.
या भेटीवेळी प्रा.डॉक्टर शरद गायकवाड, शंकर कवळे, डॉक्टर धनंजय साठे, ऍडव्होकेट मीराताई साठे, सीमाली साठे, संगीता कवळे, पुनम कवळे, राणी चव्हाण यांच्यासह साठे कुटुंबीय उपस्थित होते.