कोनवडे गावच्या " या " शिक्षकाचा समाजासाठी आदर्शवत उपक्रम

गगनबावडा – "अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे" या भावनेतून प्रेरित होऊन कोनवडे गावचे तरुण शिक्षक सचिन हिंदुराव पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. भुतलवाडी (सांगशी) येथील शाळेत कार्यरत असलेले पाटील यांनी अवयव दानाचा संकल्प करून सामाजिक भान जपले आहे.
सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रेरणेने साजरा होणाऱ्या अवयव दान सप्ताहादरम्यान त्यांनी हा संकल्प जाहीर केला. त्यांच्या मते, "जिवंत असताना इतरांच्या उपयुक्त ठरणं हे जितकं महत्त्वाचं, तितकंच मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा उपयोग इतरांसाठी होणं म्हणजेच खरे समाजधर्म पालन."
सचिन पाटील यांनी अवयव दानासंबंधी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी स्वतः प्रबोधनपर व्हिडिओ तयार केला असून, त्यांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून जनजागृती मोहीमही सुरू केली आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाला समाजातून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. अनेक तरुण त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन अवयव दानाबाबत सकारात्मक विचार करत आहेत.
त्यांचा हा संकल्प केवळ एक वैयक्तिक निर्णय नसून, तो समाजाला दिशा देणारा आदर्शवत उपक्रम ठरतो आहे. सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून, त्यांच्या या कार्यातून समाजात अवयव दानाबाबत सकारात्मक विचारधारा रुजेल, अशी अपेक्षा आहे.