पोक्सोच्या गुन्ह्यात जामिनावर असताना विनयभंगाचा गुन्हा, आरोपीची शिक्षा कायम

कोल्हापूर - पोक्सोच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असताना आरोपी प्रकाश पाटील यानं विनयभंगाचा गुन्हा केला होता. या गुन्ह्यात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेली एक वर्ष सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा आज प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी कायम केलीय. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीन ॲड.आर.व्ही.चव्हाण यांनी काम पाहिलं.
पन्हाळा तालुक्यातील आढाववाडी इथं राहणाऱ्या प्रकाश पाटील यानं पोक्सोच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असताना विनयभंगाचा गुन्हा केला होता. या प्रकरणी कळे पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी प्रकाश पाटील याला एक वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या विरोधात आरोपीनं जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. दरम्यान आज प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी निकाल देताना आरोपी प्रकाश पाटील याला एक वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवलीय. अशी माहिती सरकारी वकील ॲड.आर. व्ही.चव्हाण यांनी दिली. याच आरोपीला पॉक्सो कायद्यांतर्गत दहा वर्षांची शिक्षा यापूर्वी सुनावण्यात आली होती. यामध्ये तो जामिनावर बाहेर असताना त्यानं विनयभंगाचा गुन्हा केला होता.