SKT02 ही वाघीण ठरलीय सह्याद्रातील वाघांचा वंश वृद्धिंगत करणारी सह्याद्रीची जननी

सह्याद्रीत अधिवास करणारी SKT02 ही वाघीण सह्याद्रातील वाघांचा वंश वृद्धिंगत करणारी सह्याद्रीची जननी ठरली आहे. २०१४ ते २०२५ या कालावधीत या वाघिणीने तीन वेळा पिल्लांना जन्म दिल्याची नोंद करण्यात आली आहे. तिच्या लेकी देखील आता सह्याद्रीच्या खोऱ्यात प्रजनन करत आहेत. वन विभागाच्या मदतीने हा अधिवास अभ्यासण्याचे काम 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी आणि त्यांचे सहकारी करत आहेत. याबाबतची माहिती सातारा येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आजही वाघांचा कायमस्वरुपी अधिवास आहे. सह्याद्रीतील वाघांच्या संचार मार्गाला सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग म्हटले जाते. सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. संपूर्ण भ्रमणमार्ग प्रदेशात साधारण ३२ वाघांचे अस्तित्व आहे, तर केवळ महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार केल्यास ही संख्या ११ ते १२ च्या घरात आहे. यामधील SKT02 या वाघिणीच्या अस्तित्वाची नोंद संशोधक गिरीश पंजाबी हे २०१४ सालापासून करत आहेत. SK म्हणजे सह्याद्री-कोकण, T म्हणजे टायगर आणि ०२ म्हणजे क्रमांक असा याचा अर्थ आहे. SKT02 या वाघिणीने २०१३, २०१५ आणि २०१७ या कालावधीत पिल्लांना जन्म दिला आहे. २०१७ सालानंतर तिच्यासोबत पिल्लांची नोंद करण्यात आली नाही. २०२३ साली कॅमेऱ्यात टिपलेल्या फोटोवरुन ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, पिल्लांची नोंद झाली नाही. सद्यस्थितीत अंदाजे १५ वर्षाची असणारी ही वाघीण आजही निर्भयपणे महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जंगलात वावरताना दिसत आहे. त्यामुळे सह्याद्रीतील वाघांचे प्रजनन ती वाढवेल कि नाही याबाबत सांगता येणार नाही.
पिल्लांच्या नोंदी -
सर्वप्रथम २०१४ साली SKTo2 वाघिणीचे छायाचित्र पंजाबी आणि टीमला कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून मिळाले.* त्यावर्षी SKT02 वाघिणीच्या हद्द क्षेत्रात एक पूर्ण वाढ होत आलेली दुसरी मादीही आढळून आली. सर्वसामान्यपणे एक वाघीण दुसऱ्या वाघिणीला आपली मुलगी असल्याशिवाय आपल्या हद्दीत वावरु देत नाही. त्यामुळे छायाचित्रित झालेली मादी ही SKT02 वाघिणीची मुलगी असल्याचे मानून तिला SKT03 असा क्रमांक देण्यात आला.
२०१५ साली SKT02 वाघीण गवा खाताना कॅमेऱ्यात टिपली गेली. त्यावेळी तिच्यासोबत तीन पिल्ल आढळली.
२०१७ साली पुन्हा एकदा SKTo2 वाघिणीसोबत लहानग्या तीन पिल्लांची नोंद करण्यात आली.
यामधील SKT07 ही मादी तिचीच मुलगी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. पुढे जाऊन २०२१ साली ही मादी गोव्यातील म्हादाई अभयारण्यात आढळली. तर २०१५ साली SKT02 च्या पोटी जन्मास आलेली SKT04 ही मादी आता प्रौढ झाली असून तिच्यासोबत २०२४ साली तीन पिल्ले वावरताना दिसली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR) आणि काली व्याघ्र प्रकल्प (KTR) यांच्यातील कॉरिडॉरचे संरक्षण करणे हे STR मधील वाघांच्या नैसर्गिक वसाहतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जरी सध्या STR मध्ये फक्त नर वाघ आहेत, तरी कॉरिडॉरमध्ये प्रजनन करणाऱ्या माद्यांची उपस्थिती ही एक सकारात्मक चिन्हे आहे आणि त्यामुळे माद्यांद्वारे STR चे वसाहत देखील होऊ शकते.
गिरीश पंजाबी -
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे चांगले वनव्यवस्थापनमुळे तिलारी ते राधानगरी, राधानगरी ते चांदोली, चांदोली ते कोयना हा भ्रमण मार्ग (कॉरिडॉर) याचे संवर्धन झाल्याचे हे सिद्ध करते व भ्रमण मार्ग चे महत्व अधोरेखित करते, असे वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट संशोधक गिरीश पंजाबी यांनी म्हटले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील 'महादेवी' या हत्तीणीला गुजरात येथील 'वनतारा' केंद्रात पाठवल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. महादेवीला परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तब्बल ४५ किलोमीटरची मूक पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत हजारो नागरिक, महिला, आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. राजकारण बाजूला ठेवून, प्राणीप्रेमी आणि स्थानिक नागरिक महादेवीसाठी एकवटले आहेत. हा संघर्ष महादेवी परत येईपर्यंत सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.