खुपिरे ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा वाणवा. डिजिटल एक्स-रे मशीन बंद : आर ओ वॉटर बंद

करवीर तालुक्यातील खुपिरे इथलं ग्रामीण रुग्णालय असुविधांमुळं आजारी पडलय. रुग्णालयातील एक्स-रे मशीन बंद आहे, तर इसीजी मशीन चे कागद रोल संपलेत. पिण्याचे पाण्याचं आरो मशीन बंद असल्यानं रुग्णांची हेळसांड होत असून एक्स-रे काढण्यासाठी रुग्णांना सीपीआर गाठावं लागतय. त्यामुळं या रुग्णालयात तातडीनं सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी रुग्णांमधून होतीय.
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात असलेलं खुपिरे ग्रामीण रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड आहे. या रुग्णालयात दररोज करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. दररोज सुमारे अडीचशे ते तीनशे बाह्य रुग्णांचे उपचार इथं होतात. मात्र, गेली काही दिवस असुविधांमुळं हे रुग्णालय आजारी पडलंय. या ठिकाणी दररोज ३५ ते ४० रुग्णांचे एक्स-रे काढले जातात. मात्र सध्या एक्स-रे मशीन बंद असल्यामुळं रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी कोल्हापुरातील सीपीआर गाठावं लागतय. याबाबत क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी मनोज गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना वारंवार कळविलं असल्याचं सांगितलं. संबंधित कंपनीबरोबर संवाद झालाय मात्र यूपीएस खराब झाल्यामुळं तो येण्यासाठी उशीर होत असल्याचं सांगितलं. रुग्णालयात ईसीजी काढण्यासाठी रुग्ण येत असतात. मात्र, इथले ईसीजी रोल संपले आहेत. यामुळं रुग्णांची हेळसांड होतीय. रुग्णालयाच्या इमारतीचं नूतनीकरणाचं काम सुरूय. त्यामुळं या ठिकाणी पाण्याची समस्या उद्भवत आहे. आंतर रुग्ण विभागाजवळ असलेला आर ओ वॉटर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळं या सर्व सुविधांची पूर्तता तातडीनं करावी अशी मागणी होत आहे.