आणू महादेवीला घरी.. दोन लाख चार हजार चारशे एकवीस कोल्हापुरकरांनी दिली स्वाक्षरी

माजी आमदार ऋतुराज पाटील नांदणी गावाकडे रवाना

कोल्हापूर : नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या वनतारामध्ये रवाना करण्यात आले. त्यानंतर लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती. या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश यानिमित्ताने दिला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुरु केलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापुरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. आज सकाळी माजी आमदार ऋतुराज पाटील हे कार्यकर्त्यांसह ही सर्व पत्रे घेवून नांदणीमठाकडे रवाना झाले. त्या ठिकाणी महास्वामीजी यांच्या हस्ते स्वाक्षरी करून या सर्व फॉर्मचे पूजन करण्यात येणार आहे. दुपारी ११ वाजता रमणमळा पोस्ट ऑफीस येथून हे सर्व फॉर्म भारताचे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांना पाठविण्यात येणार आहेत.

यावेळी गणपतराव पाटील, शेखर पाटील,राहुल खंजिरे, शशिकांत खोत, विजय पाटील, विजय चौगले,सुदर्शन खोत,दीपक मगदूम,नितीन बागे आदीं उपस्थित होते.