छत्रपती राजाराम महाराजांच्या जीवनावरील ब्रेल लिपीतील पहिली पुस्तिका प्रकाशित...

कोल्हापूर - कोल्हापूरातील तरुण इतिहास अभ्यासक विक्रम रेपे यांनी दृष्टीबाधितांनाही इतिहासाची माहिती व्हावी, यासाठी यापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावरील ब्रेल लिपीतील पहिली पुस्तिका तयार केली. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवनावरील ब्रेल लिपीतील पुस्तिकेचे मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
ज्ञान प्रबोधन भवन अंधशाळेत प्रा. डॉ. केशव हरेल यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन समारंभ पार पडला. या प्रकाशन सोहळ्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनियल्सचं विशेष सहकार्य लाभले. यावेळी बोलताना मधुरिमाराजे छत्रपतींनी, छत्रपती राजाराम महाराजांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या लोकाभिमुख राज्यकारभाराचा वारसा जपत राजर्षीचे सर्व अपूर्ण संकल्प पूर्ण केल्याचे सांगितले. राजर्षी शाहू महाराजांपाठोपाठ छत्रपती राजाराम महाराजांवर ब्रेल लिपीतील पुस्तिका प्रकाशित करण्याच्या तरुण इतिहास अभ्यासक विक्रम रेपेंच्या धडपडीचे कौतुक करत मधुरिमाराजे छत्रपतींनी आता महाराणी ताराराणींवर ब्रेल पुस्तिका प्रकाशित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. केशव हरेल यांनी, छत्रपती राजाराम महाराज दूसरे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज तिसरे या तीन छत्रपतींनी देशातील अन्य राजांच्या तुलनेत आदर्शवत राज्यकारभार करुन बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केल्याचे सांगितले. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आजपर्यंत हा वारसा जपला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पुस्तिकेचे संकल्पक विक्रम रेपे यांनी, छत्रपती राजाराम महाराजांच्या जीवन कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेत पंचाऐंशी प्रश्नांचा समावेश असल्याचे सांगितले.
या वेळी केएसएचे सचिव माणिक मंडलिक, ज्ञान प्रबोधन अंध शाळेचे अध्यक्ष डॉ. सुहास बोंद्रे इनरव्हील क्लबच्या सदस्या आणि ज्ञान प्रबोधन अंध शाळेच्या संचालिका स्मिता घोसाळकर, इनरव्हीलच्या अध्यक्षा शिल्पा सावंत, सेक्रेटरी शरयू पाटील, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, हॉटेल मालक असोसिएशनचे उज्वल नागेशकर, सचिन शानबाग, माजी उपमहापौर विक्रम जरग, दीपक रेपे, प्राचार्य जे. के. पवार, डॉ. कृष्णा केळवकर, इनरव्हील क्लब ऑफ मिलेनियल्सच्या सदस्यांसह इतिहास आणि शाहूप्रेमी नागरिक, अर्धशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.