‘गोकुळ’ला सहकार्य करण्यास एन.डी.डी.बी.कटिबद्ध : डॉ.मिनेश शहा
‘गोकुळ’च्या संचालकांची गुजरातमधील एन.डी.डी.बीला भेट

कोल्हापूर – गोकुळ दूध संघ हा देशातील एक सकारात्मक दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारा आदर्श सहकारी दूध संघ आहे. एन.डी.डी.बी कडून गोकुळला आवश्यक ते सहकार्य मिळाले आहे. भविष्यात हे सहकार्य अधिक व्यापक करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे चेअरमन डॉ. मिनेश शहा यांनी दिले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ आणि संचालकांनी गुजरातमधील आनंद येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड प्रकल्प, खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या परिसरातील प्राथमिक दुग्ध संस्थांना अभ्यासपूर्वक भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी गोकुळच्या चालू उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील विविध दुग्ध व्यवसायाच्या वाढीच्या संधींवर सखोल चर्चा झाली. यावेळी गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ यांनी, एन.डी.डी.बी. च्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या योजनांचा तसेच नवीन प्रकल्पांचा अभ्यास हा गोकुळसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. गोकुळ संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून दूध उत्पादकांना अधिक सक्षम बनविण्यासाठी गोकुळ कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.
यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले तसेच अमूल फेडरेशन कार्यकारी संचालक डॉ.अमित व्यास,एन.डी.डी.बी चे डॉ.श्रीधर, डॉ.श्रीनिवास, डॉ.राजेश, डॉ.शेटकर, मनोज मुदडा, नितीन ठाकरे व अधिकारी उपस्थित होते.