विविध मागण्यांसाठी आंबेडकरी पक्ष, संघटनांची शिवाजी विद्यापीठ प्रशासनासोबत बैठक

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालय स्तरावरील विविध प्रश्नांसंदर्भात आंबेडकरी समाज पक्ष संघटना आणि जनआंदोलन संघटनांची शिवाजी विद्यापीठ प्रशासनासोबत बैठक पार पडली. या बैठकीला कुलगुरू डॉक्टर डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर व्ही. एन. शिंदे यांची उपस्थित होती.
या बैठकीत विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी स्पेशल सेल स्टैंडिंग कमिटी स्थापन करणे, जाती आधारित भेदभाव प्रतिबंध समिती स्थापन करणे, विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. यावेळी मांडलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये भोगावती महाविद्यालयाची विद्यार्थीनी प्रज्ञा कांबळेच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाकडून पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या २९७ महाविद्यालयांमधील फक्त १३० महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जाती - जमाती आणि स्पेशल सेल समित्या असल्याचे कुलगुरुंच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर त्यांनी येत्या दहा दिवसांमध्ये सर्व महाविद्यालयांमध्ये समिती स्थापन करण्याबाबत महाविद्यालयांना लेखी आदेश देण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेसाठी विशाखा समिती स्थापन करुन कार्यवाहीचा अहवाल मागवण्यात येणार असल्याचेही विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते आणि निमंत्रक प्राध्यापक शहाजी कांबळे, सचिव सतीश माळगे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या रूपाताई वायदंडे, बंडखोर सेनेचे शिवाजीराव आवळे, डॉक्टर विजय काळेबाग, अनंत मांडुकलीकर, पांडुरंग कांबळे, बाळासाहेब भोसले, संजय जिरगे, डॉक्टर राम वाकरेकर, नंदकुमार गोंधळी, दावीद भोरे, अमर तांदळे, सागर कांबळे यांच्यासह विविध आंबेडकरी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.