कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सह्यांची फॉरेन्सिक चौकशी करा
दिलीप देसाई यांची मागणी

कोल्हापूर - कसबा बावड्यातील श्रीप्रसाद वराळे या ठेकेदाराने काम न करताच बिल उचलल्याचा आरोप झाला आहे. त्याला उत्तर देताना वराळे यांनी अॅडव्हान्स बिल घेतल्याचे सांगत टक्केवारीचे रेटकार्ड जाहीर केल्याने टक्केवारीने हात बरबटलेल्यांचे धाबे दणाणलियत. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी महापालिकेतील या भ्रष्टाचाराबद्दल केवळ महापालिकेकडून होणाऱ्या चौकशीवर अवलंबून न राहता पोलिसांनी सुमोटो चौकशी सुरु करावी, अधिकाऱ्यांच्या सह्यांची फॉरेन्सिक चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
दिलीप देसाई यांनी महापालिकेत प्रशासक राज सुरु झाल्यापासून किती कामांची निविदा प्रक्रिया झाली, किती निधी आल्या आणि त्या निधीचा विनियोग कसा झाला याचा हिशोब महापालिकेने जनतेला द्यायला हवा, अशी मागणी केली आहे.
टक्केवारी प्रकरणात नावं समोर आलेल्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने काल तिघांवर निलंबनाची कारवाई करत इतरांची खातेनिहाय आणि विभागीय चौकशी सुरु केली आहे. दोषींवरील कारवाईमधील हीच आक्रमकता आणि पारदर्शकता कायम राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.