घोटाळा चौकशी समितीतून कलंकित अधिकाऱ्याला वगळा

<p>घोटाळा चौकशी समितीतून कलंकित अधिकाऱ्याला वगळा</p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील काम न करता मोठी रक्कम अदा केल्याचा घोटाळा नुकताच उघडकीस आला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याकरता नेमलेल्या समितीवर, ज्यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराचे, नियमबाह्य कामाचे अनेक आरोप झाले असे एक अधिकारी नियुक्त केले आहेत. या अधिकाऱ्याला चौकशी समितीतून ताबडतोब काढून टाकावे अशी मागणी कोल्हापूर नेक्स्ट च्या वतीने प्रशासकांकडे करण्यात आली. 

कसबा बावड्या मधील ड्रेनेजच्या एका मोठ्या कामांमध्ये एका कंत्राटदाराने काम न करताच अॅडवान्स रक्कम उचलल्याची जाहीरपणे कबूल दिली आहे.  ही रक्कम अदा करताना महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील काही अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखापाल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लेखा विभागातील काही अधिकार्‍यांचा सहभाग असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासकांनी नेमलेल्या समितीमध्ये, नगररचना खात्यात ज्यांनी भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला अशा एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. राजकीय आशीर्वादाने खाते बदल करून घेतलेल्या या अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराची चौकशी करणे म्हणजे एका चोराने दुसऱ्या चोरीचा तपास केल्यासारखे आहे. त्यातून निष्पक्ष आणि महानगरपालिकेच्या हिताचे रक्षण करणारी, खऱ्या दोषींना समोर आणणारी चौकशी होऊ शकणार नाही. त्यामुळे या अधिकाऱ्याला ताबडतोब या समितीतून काढून टाकावे अशी मागणी कोल्हापूर नेक्स्ट ने केली आहे.