कोल्हापूर जिल्ह्यातील काँट्रॅक्टरांचा सरकारला अल्टिमेट
सार्वजनिक बांधकाम विभागासमोर निदर्शने

कोल्हापूर - सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काँट्रॅक्टरनी विविध कामे पूर्ण केली आहेत. या कामांची सुमारे बाराशे कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही कंत्राटदारांना बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले आहेत.
यातूनच सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या तरुण काँट्रॅक्टरने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या घटनेनंतर काँट्रॅक्टरांकडून शासनाचा निषेध करण्यात येत आहे. आज थकीत बिलासाठी महाराष्ट्र स्टेट हॉट मिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी काँट्रॅक्टरनी आम्ही आता हतबल झालोय, आम्ही आमच्या कामाचे पैसे मागतोय, भीक मागत नाही, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नीतिमत्ता ठेऊन बोलावे असे सांगत काँट्रॅक्टरनी १५ ऑगस्टपर्यंत आम्ही सरकाराला अल्टिमेट देत असून त्यानंतर उग्र आंदोलन छेडू, असा इशारा दिला आहे. थकीत बिले दिल्याशिवाय नव्या कामांच्या निविदा काढू नका, अशी मागणीही काँट्रॅक्टर असोसिएशनने केली आहे.
बिले मिळत नसल्याने काँट्रॅक्टर आपले आयुष्य संपवू लागले असून कोल्हापूर जिल्ह्यातील काँट्रॅक्टरवर अशी वेळ आली तर संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्य सरकारकडे करु, असे काँट्रॅक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आजच्या निदर्शनांमध्ये संजीव वोहरा, बाबासाहेब गुंजाटे, व्ही. के. पाटील, योगेश कुकरेजा, आर एन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँट्रॅक्टर सहभागी झाले होते.