शक्तीपीठ महामार्गातील ५० हजार कोटीच्या पैशांच्या बडमी सभोवताली पडणाऱ्या १० -२० कोटीचा पाला गोळा करण्यासाठी काहीजणांची धडपड- राजू शेट्टी

हातकणंगले – कडब्याच्या बडमीभोवती पडणारा पाला गोळा करण्यासाठी अनेकजण सरसावतात, तसं शक्तीपीठ महामार्गात ५० हजार कोटीचा ढपला पडणारय. या ५० हजार कोटीच्या पैशांच्या बडमी सभोवताली पडणारा शक्तीपीठ मधील १० -२० कोटीचा पाला गोळा करण्यासाठी काहीजणांची धडपड सुरु असल्याचा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावलाय. साजणी येथे झालेल्या शक्तीपीठ विरोधी शेतकरी व ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते.
साजणी येथील शेतक-यांचा व ग्रामस्थांचा शक्तीपीठ महामार्गास १०० टक्के विरोध होत आहे. साजणी गावातील ३५९ शेतक-यांची जवळपास ९५ एकर जमीन संपादित केली जाणारय. मुळातच साजणी गावाला सध्या ४५० एकर जमीन शिल्लक आहे. या मधून ९५ एकर संपादित झाल्यास ३५० एकर जमीन शिल्लक राहणारय. या रस्त्यामुळे गावातील ३० ते ३५ टक्के अल्पभुधारक शेतकरी भुमिहीन होणारयत. राज्य सरकारमधील काही मंडळी समर्थनार्थ मोर्चे काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत. साजणीसारख्या गावामध्ये औद्योगीक व रहिवाशी कारणासाठी विक्री झालेल्या जमीनींची प्रतिगुंठा १० ते १२ लाख रूपये दराने विक्री होत आहे. शासनाच्या रेडी रेकनरचा दर जास्तीत जास्त १ लाख रूपये गुंठा आहे. याचाच अर्थ शेतकऱ्यांचे प्रतिगुंठा ९ ते १० लाख रूपयांनी नुकसान होणारय. गावातील अनेक पाणंद रस्ते भरावामुळे बंद होणारयत. शेतक-यांनी लाखो रूपये खर्च करून केलेल्या पाईपलाईन खराब होणार असून भरावामुळे गावाचे, शेतीचे विभाजन होणारय.
कोल्हापूर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी ढपला पाडण्याच्या हव्यासापोटी समर्थन करून ८० टक्के लोक सोबत असल्याचे सांगत आहेत. त्या लोकप्रतिनिधींनी साजणीसह बाधित गावातून बैठका घेऊन शेतकरी व ग्रामस्थांचा आक्रोश जाणून घेवून मगच बेताल वक्तव्य करावीत असं परखड मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय.
यावेळी सरपंच शिवाजी पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, सुनिल हेरवाडे, अरूण मगदूम, जंबू चौगुले, के डी पाटील, पोपट पाटील, अशोक कुन्नुरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.