कोल्हापुरातील रिक्षा चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर - आखाती देशातील युद्धामुळे भारतातही इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एल.पी.जी आणि सी. एन. जी गॅस दरात वाढ केली आहे. गॅस दरात वाढ केल्याने रिक्षा व्यवसायावर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील रिक्षा चालक आक्रमक झाले असून आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.
दसरा चौक, व्हिन्स कॉर्नर, बंसत बहार मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी रिक्षा चालकांनी एल.पी.जी आणि सी. एन. जी गॅस दरवाढ कमी करा, रिक्षा पासिंगवेळी सी. एन. जी हायड्रो टेस्ट दर पूर्ववत करा, रिक्षा कल्याणकारी मंडळास शासनाने भरीव निधी द्यावा, तसेच कोल्हापूर जिल्हा आणि शहर प्रलंबित रिक्षा थांबे त्वरित मंजूर करावेत, यासह विविध मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष विजय देवणे यांनी दिला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. आंदोलनात महासंघाचे सेक्रेटरी चंद्रकांत भोसले, महाराष्ट्र रिक्षा सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजू जाधव, अतुल पवार, संभाजी माने, पोपट रेडकेर, राहुल पोवार, आमिर गंवडी, शाम आवळे, राजेश चव्हाण यांच्यासह रिक्षा चालक सहभागी झाले होते.