सातारा पोलीस अधीक्षकांचे तातडीनं निलंबन करण्याचे आदेश
मुंबई - सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोठा राडा झाला होता. या राड्याचे पडसाद विधान परिषदमध्ये उमटले आहेत. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचे आणि ज्यांनी ढकलाढकली केली त्यांचे निलंबन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. याचे सर्व फुटेजही ताब्यात घेण्यास सांगण्यात आले आहे
सातारा जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्याच सदस्यांना सभागृहापर्यंत नेण्यासाठी पोलिसांशी आणि प्रशासनाशी झुंज द्यावी लागली. या झटापटीत शंभूराज देसाई जखमी झाले, तर मकरंद पाटील यांना 20-25 पोलिसांनी घेरले होते. अखेर बळाचा वापर करून भाजपने आपला अध्यक्ष निवडून आणला.
शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना तात्काळ बडतर्फ करत जिल्हाधिकाऱ्यांच्या सुद्धा बदलीची मागणी केली. मंत्र्यांना मारहाण होते हे मी पहिल्यांदा ऐकत असल्याचे त्या म्हणाल्या. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यास कडाडून विरोध केला.