ई-पॉस नियमभंग प्रकरणात १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

कोल्हापूर - जिल्ह्यातील १२ कृषी सेवा केंद्रांवर अनियमितता आढळल्याने कोल्हापूर कृषी विभागाने कठोर कारवाई करत त्यांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत. या केंद्रांनी शेतकऱ्यांना अनुदानित खते विक्री करताना बंधनकारक असलेली ई-पॉस प्रणाली न वापरता ऑफलाइन पद्धतीने खते विकली, असा आरोप आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, शेतकऱ्यांना अनुदानित खते केवळ डिजिटल ई-पॉस यंत्राद्वारेच विकण्याचे नियम आहेत. मात्र अलीकडेच कृषी विभागाने जिल्ह्यात राबवलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान काही विक्रेत्यांकडून नियमबाह्य विक्री केल्याचे आढळले. ई-पॉस प्रणालीतील नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांत करण्यात आलेल्या तपासणीत, १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी माहिती दिली.
निलंबित सेवा केंद्रांची नावे पुढीलप्रमाणे:
ओंकार कृषी सेवा केंद्र, लाटवडे - हातकणंगले
कृषोधन अॅग्रो सर्व्हिस, दानोळी - शिरोळ
गुरुकृपा ट्रेडर्स, साळवण - गगनबावडा
जंगम कृषी उद्योग, शाहूपुरी - कोल्हापूर
पद्मावती कृषी सेवा केंद्र, दानोळी - शिरोळ
बसवेश्वर फर्टिलायझर, दानोळी - शिरोळ
माऊली कृषी सेवा केंद्र, किणे - आजरा
मनाली कृषी सेवा केंद्र, कुर - भुदरगड
राज फर्टिलायझर अँड केमिकल्स, जयसिंगपूर
शिवतेज कृषी सेवा केंद्र, गिरगाव - करवीर
शेतकरी शेती विकास केंद्र, बाजारभोगाव - पन्हाळा
श्री रेणुका ट्रेडर्स, शाहूपुरी - कोल्हापूर
जिल्हा कृषी विभागाचा इशारा -
शेतकऱ्यांनी अनुदानित खते फक्त ई-पॉस यंत्राद्वारेच खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. किरकोळ विक्रेत्यांनी साठा ई-पॉस प्रणालीवर दाखल झाल्यानंतरच खतांची विक्री सुरू करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.