विद्यार्थ्यांनी नवीन संकल्पना राबवून कृषी क्षेत्राला नवी दिशा द्यावी : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
कोल्हापूर - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयात नव्याने बांधण्यात आलेल्या विद्यार्थिनी वस्तीगृह इमारतीचे उद्घाटन आणि प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कृषी मंत्री भरणे, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांच्या हस्ते फीत कापून शाहू कृषी महाविद्यालयात नव्याने बांधण्यात आलेल्या विद्यार्थिनी वस्तीगृहाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना नामदार दत्तात्रय भरणे यांनी, विद्यार्थ्यांनी स्वप्न साकार करण्यासाठी कठोर मेहनत करण्याचे आवाहन केले आहे. येत्या आठ ते दहा दिवसात कोल्हापुरातील शाहू कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह मंजूर करून देऊ, अशी ग्वाही दिली. कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नवीन संकल्पना राबवून राज्याच्या कृषी क्षेत्रात क्रांती करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
यावेळी नामदार भरणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान वापरून विक्रमी उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, राहुरी कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर शैलेंद्र कांबळे, संचालक प्रशांत बोडके, डॉक्टर गोरक्ष ससाणे, अभियंता मिलिंद ढोके, कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सुनील कराडे यांच्यासह कृषी विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कृषी मंत्र्यांच्या कार्यक्रमाला कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख असूनही जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.