रेशीम लागवड अनुदान रखडले... शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव...
कोल्हापूर - मनरेगा अंतर्गत राबवली जाणारी रेशीम लागवड योजना शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढ आणि रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे साधन ठरते आहे. मात्र प्रत्येक ग्रामपंचायतीला लाभार्थी निवडीच्या संख्येत मर्यादा घालण्यात आल्याने अनेक पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहत आहेत. तसेच तीन वर्षे पूर्ण झालेल्या रेशीम लागवड प्रकल्पांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे करवीर तालुक्यातील बेले येथील वीस शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
मनरेगा अंतर्गत ६०:४० प्रमाणानुसार कामकाज होत असतानाही कुशल देयके, मजुरी मस्टर तयार करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करून अनुदान वितरित करावे, कामांवरील मर्यादा शिथिल करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशा मागण्यात करण्यात आल्या आहेत. यावेळी महादेव पाटील, श्रीरंग पाटील, आप्पासाहेब डोंगरे, दिग्विजय डोंगरे, बाळू डोंगरे आदी उपस्थित होते.