धामोड परिसरात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी

<p>धामोड परिसरात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी</p>

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील धामोड-म्हासुर्ली परिसरातील शेतकऱ्यांना सध्या शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात आहे. मात्र हा परिसर वनाजवळ आणि जंगलव्याप्त असल्यामुळे रात्री शेतात काम करताना वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी धामोड पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी राधानगरी येथील महावितरण कार्यालयाचे उपअभियंता सुशांत निकम यांना निवेदन दिले. दिवसा वीजपुरवठा न केल्यास धामोड येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

राधानगरी तालुक्यातील धामोड-म्हासूर्ली हा परिसर वनक्षेत्रालगत असल्याने येथे  वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. सध्या वाढत्या उष्णतेमुळे सापांचे प्रमाणही शेतामध्ये वाढले आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे धामोडसह केळशी फिडरअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येत निवेदन सादर केले आहे. शेतीसाठी तातडीने दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा धामोड येथील महावितरण कार्यालयाला टाळ ठोकण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी एल. एस. पाटील, सुभाष नलवडे, माजी सरपंच आनंदा टेपूघडे, सदाशिव कोरे, सोहम ठीकपुर्ले, संभाजी लाड, सागर कांबळे, राजू तेली, सदाशिव पोतदार यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.