खळबळजनक : जळगावात 216 कोटींचा पीक विमा घोटाळा... 

ओसाड जमिनीवर केळी बाग असल्याचा केला बनाव

<p>खळबळजनक : जळगावात 216 कोटींचा पीक विमा घोटाळा... </p>

जळगाव - जळगाव जिल्ह्यात कोट्यवधींचा पीक विमा घोटाळा उपग्रहामुळे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ओसाड जमिनीवर केळी बाग दाखवून 216 कोटींचा विमा लाटण्याचा डाव कृषी विभागाने उधळून लावला आहे. 
फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहर हंगामात यंदा जळगाव जिल्ह्यात केळी पिकासाठी अर्जांची संख्या अचानक वाढल्याने कृषी विभागाला संशय निर्माण झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 27 हजार 259 अर्जांची वाढ झाली असून, विमा संरक्षित क्षेत्र तब्बल 28 हजार 196 हेक्टरने वाढले. ही वाढ अनैसर्गिक वाटल्याने कृषी आयुक्तांनी उपग्रहाच्या सहाय्याने तपासणी केली.
या तपासणीत जिल्ह्यातील 96 हजार 152 हेक्टर विमा संरक्षित क्षेत्रापैकी केवळ 52 हजार 110 हेक्टरवरच केळीची लागवड असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित 44 हजार 41 हेक्टर क्षेत्रावर केळी पीकच नसल्याचे आढळून आले. या बनावट अर्जदारांनी विमा हप्त्यापोटी भरलेले 37 कोटी 43 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, वेळेत तपासणी झाल्याने राज्य सरकारचा 123 कोटी 53 लाख आणि केंद्र सरकारचा 93 कोटी 58 लाख असा सुमारे 217 कोटी रुपयांचा अनुदान निधी वाचला आहे.
कृषी आयुक्तांच्या पथकाने केलेल्या प्रत्यक्ष तपासणीत चार तालुक्यांतील 74 शेतकऱ्यांकडे केळी पीकच नसल्याचे आढळले आहे. या शेतकऱ्यांनी अवघा 8 लाखांचा विमा हप्ता भरून सव्वा दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई लुबाडण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. या बनावट अर्जदारांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत.