स्वाभिमानीच्या लढ्याला यश; ओलम शुगरकडून ३५०० रूपये पहिली उचल जाहीर
चंदगड - कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये चालू वर्षीच्या ऊस हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश मिळालंय. ओलम शुगर कारखान्यानं आज पहिली उचल ३५०० रूपये जाहीर केली. त्यामुळं कारखान्यावर सुरू केलेलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन थांबवल्याचं जाहीर केलंय.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये चालू वर्षीच्या ऊस हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश मिळालं. मात्र, चंदगड तालुक्यातील इको केन, दौलत, ओलम, तसच आजरा साखर कारखाना आणि आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज या कारखान्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली ३४०० रूपये पहिली उचल जाहीर केली होती. त्यामुळं स्वाभिमानी संघटनेच्या तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला होता. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चंदगड तालुक्यातील राजगोळी इथल्या ओलम कारखान्यावर ठिय्या आंदोलन केलं. दोन दिवसांच्या ठिय्या आंदोलनामुळं कारखान्याचा गळीत हंगाम पूर्णपणे थांबला होता. शेवटी ओलम शुगर कारखान्याच्या प्रशासनानं ३,५०० रूपये पहिली उचल जाहीर केली. सायंकाळी कारखान्याच्या लेखी पत्रानंतर ठिय्या आंदोलन मागं घेतलं असल्याचं संघटनेनं जाहीर केलं.
या वेळी कर्नाटकचे माजी मंत्री शशिकांत नाईक, काडसिद्धेश्वर स्वामी, राजेंद्र गड्यान्नावर, कर्नाटक रयत संघाचे पदाधिकारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.