उघड्यावर कचरा आणि शेतात भराव टाकणाऱ्यांवर कारवाईसाठी नागरिक उतरले रस्त्यावर...
जिव्हाळा कॉलनी, उत्तरेश्वर पेठ परिसरातील नागरिकांचे आंदोलन
कोल्हापूर - शहरातील उत्तरेश्वर पेठेतून लक्षतीर्थ वसाहत, जिव्हाळा कॉलनी आणि शिंगणापूर, हणमंतवाडी जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. शिवाय उत्तरेश्वर पेठेतील लोकांची शेती या मार्गावर असल्याने शहरातील लोकांचीही या मार्गावर ये - जा असते. सकाळी, संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक या मार्गावर फिरायला येत असतात.
गेल्या काही वर्षांपासून शिंगणापूर नाका येथे ओढ्याजवळ रस्त्याकडेला लोकांनी उघड्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या मार्गावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. काही लोकांनी रस्त्याकडेच्या शेतात मोठ्या प्रमाणात दगड मातीचा भराव टाकला आहे. यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी जिव्हाळा कॉलनी आणि परिसरातील घरांमध्ये शिरते. त्यामुळे उत्तरेश्वर पेठ, शिंगणापूर मार्गावर कचरा टाकणाऱ्या तसंच दगड माती.. ची भर टाकून पूरस्थिती निर्माण करणाऱ्या लोकांवरही महापालिका प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी आज जिव्हाळा कॉलनी, उत्तरेश्वर पेठ परिसरातील नागरिकांनी शिंगणापूर नाका येथील ओढ्यावर आंदोलन केले. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या कनिष्ठ अभियंता अभिलाषा दळवी या आंदोलनस्थळी आल्या. आंदोलक महिलांनी अनेकदा तक्रार करून देखील आपण कारवाई का करत नाही? अशी विचारणा करत दळवी यांना चांगलंच धारेवर धरले. अखेर आठवडाभरात कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं. दरम्यान महापालिका प्रशासनानं आठवडाभरात संबंधितांवर कारवाई न केल्यास महापालिकेला घेराव घालू, असा इशारा आंदोलकांनी दिलाय.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील, भाऊ घोडके, संग्राम राठोड, धीरज सराटे, शिवानी पाटील, वंदना माळप, मीनार जाधव, धीरज रुकडे, संदीप पवार चंद्रकांत मरळकर यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.