रेशन बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
आनंदाचा शिधा द्या.. दसरा-दिवाळी गोड करा

कोल्हापूर - राज्य शासनाकडून दसरा, दिवाळी गोड व्हावी, यासाठी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा दिला होता. शासनाने हा शिधा बंद केलाय. हा आनंदाचा शिधा दसरा आणि दिवाळीसाठी तसंच सर्व सणांसाठी सुरु करावा. यासह इतर विविध मागण्यांसाठी आज रेशन बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी बायोमेट्रीक होत नसलेल्या रेशन कार्डधारकांच्या बाबतीत तातडीनं पर्यायी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात यावं, रेशनधान्य दुकानात तेल, डाळ, साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्यात आदि मागण्या करण्यात आल्या.
मागण्या बाबत निर्णय न घेतल्यास भविष्यात रेशन कार्डधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना घेऊन विराट मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. मोर्चात कोल्हापूर रास्त भाव धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे आबू बारगीर, राजेश मंडलिक, आनंदा लादे, संदीप लाटकर, श्रीपती पाटील, संजय येसादे यांच्यासह रेशन धान्य दुकानदार सहभागी झाले होते.