...अन्यथा कार्तिकवारीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नाही : मराठा समाजाचा इशारा

<p>...अन्यथा कार्तिकवारीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नाही : मराठा समाजाचा इशारा</p>

कोल्हापूर - शहराच्या मध्यवस्तीच्या ठिकाणी असलेली विश्वपंढरी समोरील सुमारे १०० कोटी रुपयांची सहा एकर सरकारी जागा मराठा समाजासाठी मागणी करण्यात आली होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र मराठा समाजाला डावलून ही जागा आमदार अशोकराव माने यांच्या  महिला औद्योगिक संस्थेसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. त्यामुळे मराठा समाजातून संतप्त भावना व्यक्त होत असुन, मागणी करण्यात आलेली जागा मराठा समाजालाच मिळावी, यासाठी आज मंगळवारी मराठा समाजाच्या वतीने, या जागेवर जाऊन आंदोलन करण्यात आले.

आमदार माने यांच्या संस्थेला कोणत्या हेतूनं देण्यात आली असा सवाल उपस्थित करत ही जागा मराठा समाजालाच देण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार माने यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विश्व पंढरी परिसरात मोठा पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात पंढरपूरमधील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. कोण तरी आमदार नकटा उकटा येतो आणि मराठा समाजासाठी मागणी केलेली जागा घेतो हे कदापी चालणार नाही. मराठ्यांची जागा मराठ्यांना मिळायला हवी, अन्यथा कार्तिकवारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नाही. मराठ्यांच्या इशाऱ्यानंतर कोण माईचा लाल राज्यात फिरू शकत नाही. मराठ्यांच्या विरोधात तुम्ही षड्यंत्र करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला सत्तेवर राहायचं का नाही हे तुम्ही ठरवा, असा इशारा त्यांनी दिला.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी, ही जागा आमदार माने यांनी घेऊ नये. अन्यथा मराठा पेटून उठला तर हा रोष परवडणारा नाही. असा इशारा दिला.

या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, व्ही. के. पाटील, राहल इंगवले, दिलीप सावंत, उमेश पवार, अभिजीत चव्हाण, शैलजा भोसले यांच्यासह मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.