वोट चोरीच्या विरोधात इचलकरंजीत काँग्रेसनं केलं मशाल आंदोलन

इचलकरंजी - देशभरात चर्चेत असलेल्या वोट चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ इचलकरंजी काँग्रेस कमिटीच्या वतीनं इचलकरंजीत मशाल आंदोलन करण्यात आलं. यावेळी ‘वोट चोर गद्दी छोड’, ‘निवडणूक आयोग जागा हो’ अशा घोषणाबाजी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.“वोट चोरी'' हा लोकशाहीवरील थेट आघात असून यामध्ये निवडणूक आयोगाचा कारभार पूर्णपणे संशयास्पद आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या हक्काची पायमल्ली होत असताना काँग्रेस कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत,” असा इशारा याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी दिला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ७ ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाविरोधात गंभीर आरोप करत वोटाचोरीचा प्रकार उघडकीस आणला. यामुळं निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हताच धोक्यात आल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्यावतीनं देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलंय. त्यानुसार आज इचलकरंजी काँग्रेस कमिटीच्यावतीनं गांधी पुतळ्याजवळ मशाल आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी मशाली प्रज्वलित करून निदर्शनं केली. आणि ‘वोट चोर गद्दी छोड’, ‘निवडणूक आयोग जागा हो’ अशा तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. बिहारमध्ये सुरू असलेली पदयात्रा प्रचंड जनसमर्थनात पार पडत असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी आंदोलनस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं . “वोट चोरी'' हा लोकशाहीवरील थेट आघात असून यामध्ये निवडणूक आयोगाचा कारभार पूर्णपणे संशयास्पद आहे . देशातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या हक्काची पायमल्ली होत असताना काँग्रेस कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत,” असा इशारा बावचकर यांनी यावेळी दिला.
“लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया अत्यावश्यक आहे. मात्र सध्याच्या सरकारनं सत्तेच्या मोहापोटी निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल,प्रमोद खुडे, किशोर जोशी,शेखर पाटील,रवी पाटील, अजित मिणेकर,सचिन साठे,सोहेल बाणदार बिस्मिल्ला गैबान,वेदीका कळंत्रे यांच्यासह शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.