रस्त्यांतील खड्ड्यांत अंघोळ करत प्रशासनाचा निषेध !

कोल्हापूर – जिल्ह्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन (देव देश धर्म रक्षक संघटना) तर्फे सामाजिक कार्यकर्ता अक्षय बेलेकर यांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब असून, खड्ड्यांमुळे वाहतूक ठप्प होण्याच्या घटना व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील किरवे येथे, रस्त्यातील खड्ड्यांत साचलेल्या चिखलात बसून अक्षय बेलेकर यांनी थेट अंघोळ केली. यावेळी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.