कल्याणकारी मंडळ कार्यान्वित न केल्यास तीव्र आंदोलनाचा वृत्तपत्र विक्रेत्यांचा इशारा

<p>कल्याणकारी मंडळ कार्यान्वित न केल्यास तीव्र आंदोलनाचा वृत्तपत्र विक्रेत्यांचा इशारा</p>

कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील सातही राज्य विभागांमध्ये बैठका घेऊन आंदोलनाची रणनीती ठरविणे, सर्व जिल्ह्यांतील वृत्तपत्र मालक, संपादकांनी मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांना पत्र पाठवून मंडळासाठी पाठिंबा द्यावा, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन द्यावे, राज्य संघटनेच्या परवानगीने पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढावा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. शासनाने कल्याणकारी मंडळ मंजूर केलंय, मात्र अद्याप ते कार्यान्वित झालेलं नाही. थंडी, पाऊस, वारा यांची पर्वा न करता नागरिकांच्या घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

संघटनेचे राज्य सल्लागार शिवगोंडआण्णा खोत यांनी, तालुका पातळीपासून संघटना मजबूत करण्याचं आवाहन केलं सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी आता अंतिम लढाई लढण्याची वेळ आल्याचं सांगितलं उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी, संघर्षासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं बैठकीला रमेश जाधव, सुरेश ब्रम्हपुरे, सौरभ लाड, शिवानंद रावळ, सचिन चोपडे, मारुती नबलाई, प्रशांत जगताप, शिवाजी जाधव, नंदू पोवाडे, शिवलिंग मेढेगार, नागेश गायकवाड, डी. वाय. मुजावर यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.