तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात...
शक्तीपीठ महामार्ग विरोधात आज अभिनव आंदोलन

कोल्हापूर - शक्तीपीठ महामार्ग विरोधात आज 15 ऑगस्टला अभिनव आंदोलन करण्यात आले. ज्या शेतातून शक्तिपीठ जात आहे त्या शेतात तिरंगा झेंडा लावून शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच, असा संदेश राज्य सरकारला देण्यात आला. “तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात...” हे अभिनव आंदोलन आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आले.
यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने 12 जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिना दिवशी हे आंदोलन करण्यात येत आहे.
ज्या शेतातून शक्तिपीठ जातो त्या शेतात शेतकऱ्यांसह आ. सतेज पाटील यांनी तिरंगा ध्वज लावून शक्तीपीठ रद्द करण्याची मागणी केली. कोगील बुद्रुक या ठिकाणी आ. सतेज पाटील यांनी, शेतकऱ्यांच्या सोबत खर्डा भाकरी खाऊन, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचाही निषेध केला.