"तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात"; शक्तीपीठ महामार्गाविरोधात १५ ऑगस्टला ‘तिरंगा आंदोलन

कोल्हापूर – यंदा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांकडून एक अभिनव आंदोलन उभारण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शेतात शेतकऱ्यांकडून तिरंगा झेंडा फडकावला जाणार आहे. या माध्यमातून सरकारला "तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात" हा स्पष्ट आणि ठाम संदेश दिला जाणार आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आवाज चांगलाच तीव्र होत चालला आहे. आज शनिवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत १२ जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारला थेट इशारा दिला. या बैठकीत १५ ऑगस्ट रोजी "तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात" असा ठाम संदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांनी या दिवशी मेळावे घेऊन आंदोलन छेडण्याचाही निर्धार व्यक्त केला. या बैठकीला खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार कैलास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तीपीठ बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी आमदार पाटील म्हणाले, स्वातंत्र्यदिनी शेतातच तिरंगा लावून हा महामार्ग आमच्या जमिनीत नको असं सरकारला ठणकावून सांगूया. ८६ हजार कोटींचा प्रकल्प आता १ लाख ६ हजार कोटींवर पोहोचला आहे, आणि सरकार जबरदस्तीने तो रेटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही तो होऊ देणार नाही. जिथे रस्तेच नाहीत अशा भागांमध्ये आधी रस्ते करा, आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. त्यांची जमीन हिरावून घेऊ नका. अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी मांडली.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतजमिनीच्या संरक्षणाचा मुद्दा ठळकपणे मांडला. देशातील पिकाऊ जमिनीचं क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत शेतजमीन वाचवणे ही काळाची गरज बनली आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात उभं राहणं म्हणजे जमिनीला खरं स्वातंत्र्य देणं आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला शेतामध्येच मेळावे घेऊन या महामार्गाविरोधात लढा उभारुया, अस त्यांनी सांगितलं.
आमदार अमित देशमुख यांनी, हिवाळी अधिवेशनात शक्तीपीठ विरोधात धडक मोर्चा काढूया, असं सांगितलं.
आमदार कैलास पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हटलं जातंय. मात्र, ड्रीम आहे की क्रीम आहे हे त्यांनाच माहीत, असा टोला लगावला.
माजी खासदार विनायक राऊत यांनी, हा प्रकल्प ठेकेदार व सत्ताधाऱ्यांच्या खिशात पैसा भरणारा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा शक्तीपीठ नको. शक्तिपीठ हाणून पाडू असा इशारा त्यांनी दिला.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दहा गावांमधून जाणाऱ्या प्रस्तावित महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचं सांगितलं. हा विरोध सरकार आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील तीन दिवसांत शेतकऱ्यांकडून सह्यांचे अभियान राबवण्यात येणार आहे. दहा गावांतील शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन शक्तीपीठविरोधी लढ्याला अधिक बळ दिले जाणार असून, हा लढा ताकतीने आणि ठामपणे लढण्यात येईल, असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार अरुण लाड, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह बाराही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये शक्तीपीठविरोधी ठराव, तसचं गावागावांमध्ये सह्यांची मोहीम राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.