...अन्यथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापूर - वडगावमधील बबन रणजीत पाटोळे यांनी रोजगाराच्या हेतूने १० जानेवारी २०२४ रोजी वर्तमानपत्रातील जाहिरातीनुसार श्री महालक्ष्मी तलावाच्या मत्स्य संगोपन आणि मच्छीमारी करण्यासाठीचा ठेका मिळवण्याच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. या प्रक्रियेतून प्रशासकीय ठराव नंबर २५१ नुसार २४ जानेवारी २०२४ रोजी पाटोळे यांना पंचवार्षिक ठेका मंजूर करण्यात आला. यानंतर २५ जानेवारी रोजी बबन पाटोळे आणि ठेकेदार यांच्यात पाचशे रुपये स्टॅम्पवर करार करण्यात आला. यानुसार २०२४ - २५ वार्षिक वर्षात १ लाख ७० हजार रुपये भरण्यात आले. तलावाची स्वच्छता करून यामध्ये साडे सहा लाखांचे मत्स्यबीज सोडण्यात आले. दुसऱ्या वर्षीचा ठेका सहा जानेवारी २०२५ रोजी एक लाख ७० हजार रुपये भरण्यात आला. यानंतर पुन्हा साडे सहा लाखांचे मत्स्य बीज सोडण्यात आले. मात्र २०२६ - २७ चा वार्षिक ठेक्याची रक्कम भरण्यासाठी गेले असता बबन पाटोळे यांना मनाई करण्यात आली. सर्व काही नियमात असून सुद्धा आणि १२ ते १५ लाख रुपये कर्ज काढून गुंतवणूक करून, पाच वर्षाचा ठराव असतानाही, दोन वर्षानंतर हा ठराव अचानक रद्द केल्याने बबन पाटोळे यांना धक्का बसला. त्यामुळे आज अण्णा ब्रिगेड यांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करण्यात आला. याबाबत १६ मार्च २०२६ रोजी अण्णा ब्रिगेडच्या वतीने वडगाव नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्याचबरोबर २ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. त्याच दिवशी व्हाट्सअपवर ठेका रद्द झाल्याचे पत्र बबन पाटोळे यांना प्राप्त झाले. सर्व काही कायदेशीर असताना हा मागासवर्गीय तरुणावर केलेला अन्याय आहे. त्यामुळे जर हा ठेका नियमाप्रमाणे पुढे चालू ठेवला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी आत्मदहन करू, असा इशारा अण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमोल महापुरे यांनी दिला आहे.
या तलावाजवळ येण्यास बबन पाटोळे यांना मनाई करण्यात आली आहे. दुसरीकडे दोन वर्षापासून जपलेले मासे सध्या कुणीही मासेमारी करून घेऊन जात आहे. हाता तोंडाशी आलेला घास वडगाव प्रशासनाने काढून घेतलाय, त्यामुळे हा ठेका नियमाप्रमाणे पुढे सुरू ठेवावा अन्यथा डॉ. अमोल महापुरे आणि बबन पाटोळे हे दोघे आत्मदहन करण्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे शहर संघटक दादासाहेब माने उपस्थित होते.