चित्रीकरणासाठी रोखल्याने इचलकरंजी महापालिका आवारात पत्रकारांचे आंदोलन...

<p>चित्रीकरणासाठी रोखल्याने इचलकरंजी महापालिका आवारात पत्रकारांचे आंदोलन...</p>

इचलकरंजी - महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रसार माध्यमांना चित्रीकरण करण्यास महापौर उदय धातुंडे यांनी मज्जाव केला. याच्या निषेधार्थ शहरातील डिजीटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांनी महापालिकेच्या प्रांगणात धरणे आंदोलन छेडत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर निर्बंध लादणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार असल्याची भावना आंदोलनकर्त्या पत्रकारांनी व्यक्त केलीय. सभागृहातील कामकाज पारदर्शक राहावे, यासाठी चित्रीकरण आवश्यक असताना महापौरांनी घेतलेला हा निर्णय एकतर्फी आणि हुकूमशाही वृत्ती दर्शवणारा आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, सभागृहात सुरू असलेल्या बैठकीतही या मुद्यावरून वातावरण चांगलेच तापले.

नगरसेवक मदन कारंडे, शिवसेना गटनेते रवींद्र माने, विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांनी महापौरांना धारेवर धरत प्रसार माध्यमांना चित्रीकरणाची तात्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. महापौरांनी तात्काळ निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही पत्रकारांकडून देण्यात आला आहे. महापालिका प्रांगणात सुरू असलेल्या धरणे आंदोलनात विनायक कलढोणे, साईनाथ जाधव, सॅम संजापुरे, रणधीर नवनाळे, निखिल भिसे, संतोष मोकाशी, अंकुश पोळ, वेदांत पाडळकर, गौरव कोष्टी, विजय तोडकर, अंजूम मुल्ला, संगीता हुग्गे, प्रीती कलढोणे, सचिन बेलेकर, निहाल ढालाईत, रसूल जमादार, सदिप सुर्वे, अमानत जमादार आदी पत्रकार सहभागी झाले होते.