लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा
कोल्हापूर - राज्यातील बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासह विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चाची हाक दिली होती. दसरा चौकातून हा मोर्चा सुरू झाला. मोर्चात हजारो कामगार सहभागी झाले होते.
यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रमुख मार्गावरून हा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडकला. मागण्यांबाबत कार्यवाही झाली नाही तर राजव्यापी आंदोलन करण्याचा इशारा बांधकाम कामगार संघटनेचे सचिव शिवाजी मगदूम यांनी दिला आहे.
मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांना देण्यात आले. मोर्चात लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, उपाध्यक्ष भगवान घोरपडे, शिवाजी मगदूम, चंद्रकांत यादव, प्रकाश कुंभार, संदीप सुतार, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि बांधकाम कामगार सहभागी झाले होते.