महापालिकेच्या सभागृहातील दंगेखोर प्रवृत्तीवर कठोर कारवाईची हिंदू एकताची मागणी
कोल्हापूर - महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ‘हिंदू एकता आंदोलन’ संघटना आक्रमक झाली आहे. सभागृहातील दंगेखोर प्रवृत्तीचा निषेध करत, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी संघटनेने महापौरांकडे केली आहे.
१८ मार्चला कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळानंतर शहरातून संताप व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार केल्याने लोकशाहीची प्रतिमा मलिन झाल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू एकता आंदोलन संघटनेने महापौर रुपाराणी निकम यांना निवेदन देत संबंधित नगरसेवकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. संघटनेने सभागृहातील गैरवर्तन करणाऱ्या नगरसेवकांना निलंबित करण्यासोबतच, महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांना कामकाज पाहता यावे, यासाठी प्रशस्त सभागृह आणि प्रेक्षक गॅलरीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी विलास मोहिते,गजानन तोडकर, बाबा वाघापुरकर, बाबु साखळकर ,शिवाजी चिले, अनिरुद्ध कोल्हापूरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.