गॅस दर वाढीविरोधात काँग्रेस आक्रमक... 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘बोंब मारो’ आंदोलन

<p>गॅस दर वाढीविरोधात काँग्रेस आक्रमक... </p>

कोल्हापूर –  गॅस दर वाढीविरोधात आज  कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक आणि हॉटेल चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किंमती तात्काळ कमी करून त्याचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सांगितले की, महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत झालेली मोठी वाढ ही जनतेवर अन्यायकारक आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या तरी त्याचा बोजा जनतेवर पडू दिला नव्हता. त्यावेळी घरगुती सिलिंडर साधारण ४०० रुपयांना मिळत होते, मात्र आता त्यासाठी ९०० रुपयांपेक्षा जास्त मोजावे लागत आहेत.
या आंदोलनात महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, इंद्रजीत बोंद्रे, भारती पोवार, वैशाली महाडिक, सरलाताई पाटील, प्रतापसिंह जाधव, तौफिक मुलानी, उज्वला चौगुले, बाळासाहेब सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.